Ad Code

Responsive Advertisement

माझ्या गावावर पडलेला दुष्काळ आणि त्यात घडलेला एक ह्रदयद्रावक प्रसंग!

माझ्या गावावर पडलेला दुष्काळ


माझ्या गावावर पडलेला दुष्काळ आणि त्यात घडलेला एक गंभीर आणि ह्रदयद्रावक प्रसंग!

 2014 ते 2015 या वर्षातील ही घटना आहे.


असाच एकटा एकांतात बसलो होतो मला कसा काय माहित दुष्काळ आठवला, पाण्यासाठी हंबरडा फोडणारी गाय अन पायात वाहन नसताना पळणारी माय आठवली. मी थोडा भावनिक झालो आणि एकाकी आठवला दुष्काळाशी सामना करणारं आमच्या गावातील दसरथ वखरे मामाचं कुटुंब. गरिब इमानदार, शब्दाला मान देणारा आणि दुसऱ्याचं कधीही चांगल व्हावं असा त्याचा स्वभावगुण. 

एके दिवशी काय झालं गावात दुष्काळ पडल्यामुळे, पाणी नव्हतं प्यायला म्हणून ग्रामपंचायत ने टँकर सुरु केलेलं पण ते काही पुरेनास झालं, लहान,मोठे,म्हातारी माणसं पाण्यासाठी झुंझायचे आणि एकच झुंबड उडायची. 

आपली ग्रामपंचयत तर वांझ आहे तिची फळण नीट व्हायना ती गरोदर रायना अन तिची डिलिव्हरी व्हायना अशी गत. उन्हाळ्यात पाण्यासाठी कुठलीही ठोस व्यवस्था नाही. दरवर्षी उन्हाळयात पाण्यासाठी लोक तगमगायचे, झगडायचे.

असेच काही दिवस टँकर आलं नाही म्हणून पाण्यामुळं लोक कासावीस झाले.  अशा परिस्थित वणवण करून कोठुण तरी पाणी शोधून आणायचे या हेतूने गावातील दसरत मामाचा मुलगा 'आप्पा' तो पण गावच्या शेजारच्या विहिरीवर भर दुपारी पाणी आणायला गेला. ऊन रखरखत होत, जवळ चितपाखरू नाही असं भयान वातावरण भासत होत. 

विहिरीवर गेल्यावर त्याने पाणी शेंदून काढण्यासाठी आणलेली बादली घेतली आणि विहीरीतून पाणी काढू लागला आणि अचानक त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला, जवळ कोणी नव्हतं आणि त्याला पोहायला पण येत नव्हतं. तो जिवाच्या आकांताने ओरडू लागला पण त्याचा आवाज ऐकणारं कोणीही तिथे नव्हतं. विहिर खोल होती, पाण्यात त्याने गटांगळ्या  खाल्ल्या त्याचा जीव तगमगला, तळमळला, कासावीस झाला, आता आपण मरणार हे त्याला कळून आलं आणि अखेरचा श्वास सोडला. त्याचा जीव किती गुटमतिला आला असेल ही शब्दात सांगण खूप कठीण आहे. त्याने शेवटचा श्वास घेतला आणि काही क्षणात दशरथ मामाला पोरक करून गेला.

17-18 वर्षाचा तरुण मुलगा गेल्यावर गावात चर्चेला उधाण आलं, प्रत्तेकजण  मामाजवळ जायचा आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत होता. त्याचे डोळे रडून रडून खोल गेले होते घसा कोरडा पडला होता डोळ्यासमोर त्यांना फक्त आप्पा दिसायचा, दिसणारच.. पोटचा गोळा होता त्यांच्या तो. त्याची आई गावातल्या बायांच्या गळ्यात पडून रडायची.

दसरत मामांनी तर जगण्याची उमिद सोडली होती कारण हाताखाली आलेलं पोरग गेलं होतं पण कसाबसा धीर धरला जगू लागला, येणाऱ्या नवीन दिवसासोबत त्यांना दु:खाचा विसर पडत गेला. जातीनं वारीक कष्ट करूनच खाणार अशी त्याची वागणूक, जमीन जुमला नाही नोकरी नाही, गावच्या फाट्यावर केस कापायचे दुकान यावर पोट भरतो. मामांचा चा हा संघर्ष, झुंज, धडपड आजतागायत चालू आहे. कुणाचं लग्न कार्यक्रम असला की मामाच पुढे होऊन हिरीरीने भाग घेणार. लग्नानंतर कुणाच्याही मुलीची पाठवणी करताना त्याच्या डोळ्यात अश्रू येणारच! असा हा मामा, पण निसर्ग कोपला आणि काळाने त्याचा कोहिनुर हिराच नेला.

भावपूर्ण श्राद्धान्जली मित्रा!


संकलन:

तिपटे अशोक (नंदू)

(तुमच्याही अनुभवातल्या काही सत्य घटना तुमच्या मनात असतील तर आम्हाला खालील पत्त्यावर ईमेल पाठवा, आम्ही तुमच्या नावाने त्या प्रकाशित करू)

ईमेल ID : kalerahul777rk@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu