ऊसतोड कामगारांचे जीवन.. गोड उसाची कडू कहाणी..?
हे जे चित्र दिसतंय ते आहे ग्रामीण भागातून उसतोडीला गेलेल्या एका दांपत्याच, चित्रात अंधार दिसतो लाईट लावून ते ऊस भरताना दिसतात म्हणजेच ते रात्रीचं पण काम करतात.
उसतोड कामगारांच्या जीवनात किती वाईट दिवस येतात आणि किती संघर्ष करावा लागतो याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो, खरा अनुभव तर प्रत्यक्षात त्यांना पाहिल्यावर येतो. सोबत लहान बाळ घेऊन आणि थंडीचे दिवस, ज्या वयात मखमली गादीवर झोपायचं वय असंत त्या वयात मात्र त्या बाळाला उसाच्या पाचरडावर रात्री काढाव्या लागतात. मग ती माऊली केंव्हा उठत असेल, कधी स्वयंपाक करत असेल, ते छोट बाळ आणि तिची तगमग याचा बारकाईने विचार केल्यास आपल्याला तिला होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाचा अंदाज येईल.
राहायला घर ना दार एक पाचरडाची खोप केलेली असते आणि त्याच खोपेला आपला अलिश्यान बंगला म्हणुन कस तरी मनाची समज घालून जगायचं.
उसतोडीला मराठवाड्यातील लोक जास्त जातात कारण मराठवाड्यात नेहमी दुष्काळ असतो, तसेच सावकाराचे कर्ज आणि पोटाची खळगी भरण्यासाठी उसतोडीला जावेच लागते हाच त्यांचा एकमेव पर्याय..!
आज कित्येक वर्षानंतर त्यांचे संघर्षमय जीवन बदलेलं नाही. बदलेल तरी कसं ! स्वतःच्या गरजात आणि सावकारांच्या कर्जातच त्यांची सगळी वर्षानुवर्षाची कमाई चालली जाते. भविष्यासाठी तडजोड तर खूप लांबची गोष्ट.
आपल्या मुलांना मोठं करण्यासाठी आई वडिलांना खूप कळा सोसाव्या लागतात, अशा परिस्थितीत त्यांच्या शिक्षणाची फरफट होते. याचा परिणाम त्यांच्या पुढच्या पिढीवर पण होतो. ते पण या दलदलीत अलगद फसतात, ते ही अगदी कायमचे!
कधी येतील आमच्या शेतकऱ्यांचे चांगले दिवस? आणि कधी त्यांची त्या ऊसाच्या पाचरडातून सुटका होईल? त्या उसापासून बनलेली साखर मात्र सगळे लोक गोड म्हणून खातात पण शेतकऱ्याला मात्र ती गोडी कधीच अनुभवता नाही आली. त्याला ठाऊक आहे ती फक्त त्या गोड उसाची कडू कहाणी..!
अशोक तिपटे.

0 टिप्पण्या