लग्न ही प्रत्तेकाच्या आयुष्यातील एक महत्वाची आणि जिव्हाळ्याची गोष्ट आहे. दुसऱ्याच लग्न बघून का होईना पण स्वतःच्या लग्नाचा विचार प्रत्तेक तरुण व तरुणींच्या मनात डोकावल्याशिवाय राहत नाही. काही जण तर लग्न कधी होतंय याच विचारात असतात. पण आजकाल लग्न करणं सगळ्यांसाठी एवढं सोपं नाही राहिलं. खास करून काही मुलांच्या बाबतीत तर लग्न हा एक गंभीर प्रश्न बनलाय! लग्नाबद्दल वाढत चाललेल्या काही समस्या आणि त्याची कारणे येथे दिलेली आहेत ती नक्की वाचा. हे का आणि कश्यामुळे होतंय यावर एक नजर टाकुया.
आजकालच्या पोरांच्या लग्नाबद्दलच्या समस्या ..!
नौकरी नाही, जॉब नाही मग कसं करणार लग्न?
हा एक सर्वात महत्वाचा प्रश्न आहे जो पोरांना चिंतेत टाकतो आहे, याचं कारणही तसंच आहे! शिकून चांगली नौकरी लागेल आणि मग लाइफ सेट होईल अशीच अपेक्षा आपलं कुटुंब आणि समाज ठेवत असतो. या दडपणाखाली आजची पोरं जगत असतात आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ते स्वतःला काय पाहिजे याचा कधी विचारच करत नाहीत. अशा परिस्थितीत काहीजण नौकरी मिळवण्यात यशस्वी होतात पण त्याहूनही जास्त तरुण खचून जातात आणि त्यांच पाऊल चुकीच्या दिशेने पडतं. घरच्यांचा त्यांना हवा तसा आधार मिळत नाही आणि समाजात त्यांना नावं ठेवली जातात. आपल्याला नौकरी नाही आणि मग मुलगी कोणी देणार नाही असा न्यूनगंड तरुणांच्या मनात घर करून बसतो. त्याला खूप काही चांगलं करून दाखवायचं असतं त्याच्या आयुष्यात, पण कोणी त्याच्याबद्दल सकारात्मक भावनेने बघत नसतो. मग हा तरुण चुकीच्या मार्गाला जाऊन स्वतःला आणि कुटुंबाला भयानक मानसिक त्रासात टाकतो.
मुलींच्या घरच्यांच्या अपेक्षा आणि फक्त पैशाला केंद्रस्थानी ठेऊन त्यांचा निर्णय.
आपल्याकडे दुसऱ्यांचं अनुकरण करण्याची पद्धत फार पूर्वीपासून चालत आली आहे. एखाद्या चित्रपटाप्रमाणे किंवा काल्पनिक आयुष्य असावं, आणि त्यात कुठेही कसलाच त्रास नसावा अशीच मानसिकता आपल्याकडे बनत चालली आहे. मुलींच्या घरच्यांच्या अपेक्षा ह्या ते लोक काय म्हणतील याचाच विचार करून आपलं पाऊल टाकतात. आपल्या मुलीला ते असं स्थळ शोधत असतात जिथे त्यांच्या मुलीला अगदी आनंदात आणि वैभवात राहता येईल. त्या तरुणाचा विचार तर ते करतच नाहीत. माझ स्वतःच मत असं आहे की जो तरुण मेहनती असेल, त्याच्यामध्ये स्वतःची परिस्थिति बदलण्याची धमक असेल तर तोसुद्धा भविष्यात खूप मोठा होऊ शकतो. फक्त गरज आहे ती आपल्या लोकांच्या विश्वासाची.

0 टिप्पण्या